चंद्रपूर : चंद्रपूरामध्ये खर्ऱ्याची उधारी वसूल करण्यासाठी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील दुर्गापूर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लैगिंक शोषणातून पीडित मुलगी गर्भवती झाल्याने ही घटना उजेडात आली. दुर्गापूर पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. बबन रोहणकर (वय-५२) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बबन रोहणकर याची दुर्गापूर भागात पानटपरी आहे. त्याच्या टपरीवर १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी खर्रा खरेदी करण्यसाठी यायची. तिची खर्ऱ्याची उधारी ३ हजारांवर गेली होती. मात्र, उधारी न फेडू शकल्याने आरोपी अल्पवयीन मुलीचे गेल्या ४ महिन्यांपासून लैंगिक शोषण करत होता.
याच शारीरिक शोषणातून मुलगी गर्भवती राहिली. त्यामुळे या सर्व प्रकार उजेडात आला.त्यानंतर पोलिसांनी कलम ३७६, पोक्सो, ॲट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नेमक काय घडलं?
अल्पवयीन मुलीला खर्रा खाण्याचं व्यसन लागलं होतं. तिला खर्रा खाल्ल्याशिवाय चैन पडत नव्हता. सुरुवातीला ती पैसे देऊन खर्रा विकत घ्यायची. मात्र, व्यसन वाढल्यानंतर तिला पैसे देणं अवघड झालं होतं. त्यामुळे अल्पवयीन मुलगी उधारीने खर्रा विकत घेऊ लागली. तिला आरोपीने देखील सुरुवातीला उधार खर्रा दिला.
दरम्यान, उधारी वाढायला लागल्यानं आरोपी बबन तिच्यावर रागावत होता. आरोपीने पीडित मुलीला पैशांची मागणी केली असता तिने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आरोपीने उधारीच्या बदल्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तो सतत तिचे लैगिंक शोषण करू लागला. यातून पीडित मुलगी गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.