मलकापूर : मलकापूर येथील एका नामांकित मराठी शाळेत एकाच वर्गातील तब्बल १५ विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातावर कापून घेतल्याचा प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे विद्यार्थी अवघ्या इयत्ता सहावी कक्षेत शिकत असून वर्गातील एका विद्यार्थ्याने जो मर्द असेल तो हातावर वार करेल, या एका वाक्यावर हा प्रकार घडला असल्याची चर्चा आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, मलकापूर मराठी माध्यम शिकवणारी एक मोठी शाळा आहे. या शाळेतील इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्याच्या सवंगड्यांना आपल्यामध्ये जो कोणी मर्द असेल, तो हात कापून घेईल व इतर जे कापणार नाहीत ते नामर्द असतील असे प्रोत्साहित केले. त्यामुळे मर्द कोण याबाबत विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लागली आणि थोड्याच कालावधीत एकामागून एक अशा तब्बल १५ जणांनी शार्पनर ब्लेडने हाताच्या वरील बाजूस कापून घेतले. सदरील प्रकार शिक्षकांना समजताच शिक्षकांनी सर्वप्रथम प्रथमोपचार केले व त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना तातडीने शाळेमध्ये बोलावून सदरील विद्यार्थी त्यांच्या ताब्यात दिले.
सोशल मीडियाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे सदरील प्रकार घडल्याची चर्चा असून दुर्दैवाने कुणाची नस कापली गेली असती तर एखादा जीव गमवावा लागला असता, असे अनेक पालकांनी बोलून दाखवले. या प्रकारामुळे शिक्षकांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून भविष्यात असा प्रकार घडू नये यासाठी मुलांमध्ये मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. मात्र, शाळेची बदनामी होऊ नये म्हणून या प्रकारावर पडदा टाकण्यात आला आहे.