नागपूर : दुकानातील ११ लाख ४० हजारांची रोकड बँकेत जमा करण्याकरिता घेऊन जात असलेल्या कर्मचाऱ्याला तीन आरोपींनी रस्त्यात अडवून डोळ्यात मिरची पावड फेकून, तसेच मारहाण करून त्याच्याजवळची रोकड घेऊन पोबारा केला. ही घटना १२ मार्च रोजी घास बाजार रोडवरील हिंदुस्तान शाळेजवळ घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
शेख मुजफ्फर उर्फ गुड्डू (४८, रा. टिमकी पोलीस चौकीजवळ) हा तीननल चौकातील प्रतवी मेटलचे मालक किरण चिंचललापुरे यांच्याकडे काम करतो. १२ मार्च रोजी दुपारच्या सुमारास तो दुकानातील ११ लाख ४० हजारांची रोकड एका काळ्या रंगाच्या पिशवीत टाकून सीए रोडवरील टेलिफोन एक्सचेंज चौकातील एचडीएफसी बँकेमध्ये जमा करण्याकरिता स्कूटरने जात होता. घास बाजार रोडवरील हिंदुस्तान शाळेजवळ एका काळ्या रंगाच्या सुझुकी स्कूटरवर आलेल्या तीन व्यक्तींनी पाठीमागून येऊन त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकले आणि थांबविले. त्यानंतर मारहाण करून शस्त्राच्या धाक दाखवत त्याच्याजवळ असलेली ११ लाख ४० हजारांची रोकड असलेली काळ्या रंगाची पिशवी जबरदस्तीने घेऊन पसार झाले.
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, परिमंडळ क्रमांक ३ च्या पोलीस उपायुक्त महक स्वामी, साहाय्यक पोलीस आयुक्त श्वेता खाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत जी. चदिवार, साहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत किचक, लकडगंज पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक नयना माहूलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलीस ठाण्यातील ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज जमा केले. तसेच डीबी पथकास वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास रवाना केले. या प्रकरणी शेख मुजफ्फर उर्फ गुड्डू यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अप क्रमांक २०५ / २०२५ कलम ३०९ (६), (३), (५) भारतीय ज्यायसंहिता गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.