पुणे : ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालं असून वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चिमणराव-गुंड्याभाऊ मालिकेतल्या ‘गुंड्याभाऊं’ची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. मालिकेतली दिलीप प्रभावळकर आणि बाळ कर्वे यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. तसेच, बन्याबापू चित्रपटातील त्यांची ‘बापू’ ही भूमिका गाजलेली. त्यांच्या जाण्यानं मराठी कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून एक हरहुन्नरी कलाकार हरपला आहे.
बाळ कर्वे पेशानं इंजिनिअर होते. पण, अभिनयाची आवड जास्त असल्यामुळे त्यांनी अभिनेता होण्याचं स्वप्न पाहिलं. त्यांचं खरं नाव ‘बाळकृष्ण’ असं होतं. मात्र सर्वजण त्यांना ‘बाळ’ या नावानंच हाक मारत आणि याच नावानं त्यांना प्रसिद्धी मिळाली. रंगकर्मी विजया मेहता या त्यांच्या नाट्यक्षेत्रातील गुरू होत्या. चिमणराव ही भारतीय टेलिव्हिजनवरील पहिली मालिका होती. त्यात त्यांनी ‘गुंड्याभाऊ’ ही भूमिका साकारली. त्यानंतर स्वामी मालिकेत त्यांनी ‘गंगोबा तात्या’ ही भूमिका केली, जी प्रेक्षकांच्या लक्षात राहिली.
बाळ कर्वे यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांतून दर्जेदार भूमिका साकारल्या. सूर्याची पिल्ले, रथचक्र, तांदुळ निवडता निवडता, मनोमनी, कुसुम मनोहर लेले या नाटकांमधील त्यांचा अभिनय गाजला. प्रपंच, राधा ही बावरी, वहिनीसाहेब, उंच माझा झोका या मालिकांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या.
जैत रे जैत हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर सुंदरा सातारकर, चांदोबा चांदोबा भागलास का, चटक चांदणी, बन्याबापू अशा सिनेमांमध्ये त्यांनी अप्रतिम भूमिका केल्या. याशिवाय सई परांजपे दिग्दर्शित कथा या हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केलं. मराठीतील गाजलेलं प्रीतीचं झुळझुळ पाणी हे गाणं बाळ कर्वे यांच्यावर चित्रित झालं आहे.
उत्कृष्ट अभिनयकौशल्य, मराठी भाषेवरील प्रभुत्व, नम्र स्वभाव, अभिनयाची जाण आणि सहकलाकारांशी जिव्हाळ्याचं नातं हे बाळ कर्वे यांचे वैशिष्ट्य होतं. त्यांच्या निधनानंतर मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.







