पुणे : सध्या अनेक तरुणाईंमध्ये एनर्जी ड्रिंक्स पिणे हा आवडीचा विषय बनला आहे. तरुणवर्ग याकडे जास्त आकर्षित होत आहे. अनेक एनर्जी ड्रिंक्स मॉल आणि स्टोअरमध्ये विकले जातात. परंतु ही पेये मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत, याची जाणीव पालकांनाही नसते. त्यामुळेच राज्यातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणा-या, नशा आणणा-या अप्रमाणित एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील शाळा आणि कॉलेजच्या 500 मीटरच्या परिसरात खुल्या पद्धतीने कॅफेनयुक्त एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्यात येत आहे. याबाबतची घोषणा अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. तशा सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.
कॅफेनचे अतिरिक्त प्रमाण असलेल्या थंड पेयांच्या विक्रीवर बंदी आणण्याबाबत सत्यजीत तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील मुंबईसह नाशिक तसेच शहरी आणि ग्रामीण भागात एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनचे अतिरिक्त प्रमाण असलेले एनर्जी ड्रिंक्स विकले जातात. 250 मिलीच्या बाटलीत 75 मिली ग्रॅमपेक्षा जास्त कॅफेन असल्यामुळे नशा येते. त्याचा मेंदू, किडणी, मज्जातंतू यावर विपरित परिणाम होऊ शकतो. याचाच परिणाम म्हणजे, अस्वस्थता, निद्रानाश, लठ्ठपणा असे आजार मागे लागू शकतात. त्यामुळे शाळा आणि कॉलेजच्या परिसरात एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली होती.