पुणे : राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी विविध पर्यटन आवडत्या स्थळांना भेट देतात. महाराष्ट्रात अशी काही ठिकाणं आहेत ज्याठिकाणी पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात पर्यटक आवर्जुन भेट देतात. मात्र याठिकाणी काही वेळा जीवितहानी होण्याच्या घटना घडतात. यामुळे धबधबा, धरण, तलाव क्षेत्रात जीवितहानी होऊ नये त्या पार्श्वभुमीवर लोकप्रिय पावसाळी पर्यटन स्थळ बंद ठेवण्यात आली आहे.
पावसाळ्यात ‘या’ लोकप्रिय पर्यटन ठिकाणांवर बंदी
– पुणे जिल्ह्यातील वरसगाव धरण, सिंहगड, माळशेज घाट, शिवनेरी, माणिकडोह, भाटघर धरण, ताम्हिणी घाट, भीमाशंकर अभयारण्य, आंबेगाव भिमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंडवळ धबधबा, चासकमान धरण, भोरगिरी घाट या ठिकाणी बंदी आदेश लागू असणार आहे.
– ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर धबधबा, भोज, दहिवली, पडाळे धरण, माळशेज घाट, नाणेघाट, गोरखगड, भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी नदी परिसर, आणि शहापूर तालुक्यातील भातसा धरण आणि परिसर, माहुली किल्ला आणि पायथा, अशोक धबधबा, आजा पर्वत, सापगाव नदी किनारा, कळंबे नदी, आंबेशिव नदी, चंदेरी गड, चांदप, आस्नोली नदी, बारवी नदी, कल्याण तालुक्यातल्या कांबा, पावशेपाडा, खडवली नदी, टिटवाळा नदी, गणेश घाट, मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, डोंगरन्हावे, सोनाळे, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, कसारा घाट आणि घाटातले धबधबे या पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे.
– कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी परिसरातील धबधबे आणि धरणाजवळ पर्यटनाला बंदी घातली आहे. शाहुवाडी तालुक्यातील सर्वच धबधबे आणि पर्यटन स्थळांवर कलम 144 लागू केले आहे. भुशी डॅम दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील बरकी, केर्ले ऊखलू धबधब्याकडे जाणारे मार्ग प्रशासनाने बंद केले आहे.
– छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील धबधब्याजवळ रील आणि फोटो काढण्यास बंदी घातली आहे. अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा परिसरात रिल करण्यास बंदी केली आहे. सप्तकुंड धबधबा परिसर हा सुरक्षेच्या कारणास्तव धोकादायक असल्याने फोटो काढण्यास बंदी केली आहे.