लखनऊ : आयुष्याच्या शेवटच्या काळात सून आणि मुलासोबत राहायचे होते. पण त्यांनीच चांगली वागणूक न देता त्रास दिला. आणि वृध्दाश्रमात ठेवले. म्हणून दुःखी झालेल्या मुलगा व सुनेवर चिडलेल्या एका ८० वर्षाच्या वृद्ध बापाने दीड कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता राज्यपालांना दान केली आहे. शिवाय मुलाकडून अंत्यसंस्काराचा अधिकारही हिसकावून घेतला आहे. यामुळे मुलांनाही चांगलीच अद्दल घडली आहे.
नथू सिंह (वय-८०, रा. बिरल, मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश) असे दान करणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नथू सिंह हे एक शेतकरी आहेत. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. नाथू सिंह सध्या वृद्धाश्रमात राहतात. आयुष्याच्या शेवटच्या काळात सून आणि मुलासोबत मी राहायला हवं होतं. पण त्यांनी मला चांगली वागणूक दिली नाही. त्यामुळेच मी राज्यपालांना संपत्ती ट्रान्स्फर करण्याचा निर्णय घेतला. या संपत्तीचा योग्य वापर व्हावा हाच या मागचा हेतू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नाथू सिंह यांनी संपत्ती दान करण्यासाठी एक अर्ज केला. आपल्या कोणत्याही मुलाला आपल्या मालमत्तेचा वारस मिळावा अशी आपली इच्छा नाही. तसेच कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अंत्यसंस्काराचा अधिकार मिळू नये. या संपत्तीमध्ये एक घर. १० एकर जमीन आणि अचल संपत्तीचा त्यात समावेश आहे. ही सर्व संपत्ती त्यांच्या निधनानंतर सरकारकडे जाईल, असं अर्जात नमूद केलं आहे.
नाथू सिंह सांगतात, ‘शनिवारी मी यूपीच्या राज्यपालांना संपत्ती सुपूर्द करण्यासाठी शपथपत्र दाखल केलं, माझ्या मृत्यूनंतर सरकारने या जमिनीवर शाळा किंवा रुग्णालय सुरू करावं, अशी विनंती केली.’