कोल्हापूर : देशातील पहिले गाढवांचे प्रदर्शन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान कोल्हापुरातील कनेरी मठ येथे होत असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकसभा हे अनोखे प्रदर्शन भरवण्यात येणार असून तब्बल ६९ लाखांची बक्षीसे देखील यावेळी दिली जाणार आहेत. प्रदर्शनाबरोबरच सौंदर्य स्पर्धाही भरवण्यात येणार आहे.
गाढव हा अतिशय उपयुक्त प्राणी आहे. गाढवाचे दूध हे अन्य प्राण्यांच्या दुधापेक्षा महाग आणि दुर्मिळ असतं. यापासून सौंदर्य साधनं तयार केली जातात. मात्र, असे असले तरी सध्या गाढव प्रजाती दुर्मिळ होत चालली आहे. त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यामुळे त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पंचमहाभूत लोकोत्सवात २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
यामध्ये देशी प्रजातींच्या गाय, म्हशी, बकरी, अश्व, गाढव, कुत्रे व मांजर यांचाही समावेश करण्यात आला असून या प्रदर्शनात जनावाराच्या सौंदर्य स्पर्धाही होणार असून ६९ लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
कणेरी मठावर देशी जनावरांचे काळजी घेण्यासाठी गोशाळा आहे तर नुकतेच भटक्या कुत्र्यांची शाळा सुद्धा सुरू करण्यात आली आहे. इथे हजारो रस्त्यावरील मोकाट कुत्रे ठेवण्यात आली आहे. श्वानांवर शिवाय दोन वेळेचे जेवण, औषधोपचार केले जाते. मात्र, गाढवाची प्रजातीही वाढावी म्हणून विशेष स्वरूपात गाढवांसाठी प्रदर्शन भरवण्यात आले असून या महोत्सवासाठी मोठ्या संख्येने शेतकरी येणार आहेत.
दरम्यान, तीन दिवस भरणाऱ्या या प्रदर्शनात गाय, म्हशी, बकरी, घोडे, गाढव, कुत्रे व मांजर यांचा सहभाग आहे. यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट गाय आणि बैलाला एक लाखाचे तर म्हैस व रेड्याला ५१ हजारांचे बक्षीस दिले जाईल.
देशी अश्व स्पर्धेत प्रथम क्रमांकास लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहेत. तर विशेष म्हणजे गाढवांच्या प्रदर्शनासाठी देखील सौंदर्य स्पर्धा आणि त्यावर पुरस्कार जाहीर करण्यात आले असून या प्रदर्शनाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.