नाशिक : नाशिक व अमरावती येथील पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली असून ३० जानेवारीला ही निवडणूक संपन्न होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पदवीधरच्या २ तर शिक्षक मतदारसंघाच्या तीन जागांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीची अधिसूचना ५ जानेवारीला निघणार असून, ३० जानेवारीला मतदान तर २ फेब्रुवारीला मतमोजणी घेण्यात येणार आहे.
पदवीधरच्या दोन आणि शिक्षक मतदारसंघाच्या तीन जागांसाठी १२ जानेवारी पर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे.
सध्या नाशिक पदवीधरमध्ये काँग्रेसचे सुधीर तांबे, अमरावतीमध्ये भाजपाचे रणजीत पाटील हे आमदार आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विक्रम काळे, कोकणमध्ये बाळाराम पाटील तर नागपूरचे नागो गाणार यांच्याकडे आमदारकी आहे. सध्याच्या राजकीय समीकरणात कोणत्या मतदारसंघातून कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे स्नेही तसेच युवक कॉग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक महत्वाची आहे. अमरावती येथून पदवीधरमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच भाजपाने रणजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे ही जागा भाजपासाठी महत्वाची असणार आहे.