-संतोष पवार
पळसदेव : चालू वर्षातील खरीप हंगाम 2024 साठी शेतकरी स्तरावर ई -पीक पाहणी करण्यासाठी राज्य शासनाकडून 23 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यापूर्वी खरीप हंगाम 2024 ई – पीक पाहणी करण्यासाठी एक ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत शेतकरी स्तरावर मुदत होती. परंतु मुसळधार पाऊस, काही तांत्रिक अडचणी लक्षात घेता शेतकऱ्यांपर्यंत ई – पीक पाहणी करण्यासाठी आवश्यक माहिती पोहोचली नसल्याने शेतकऱ्यांकडून त्यास अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला, असे शासनाच्या निदर्शनास आल्याने राज्यशासनाने याबाबत परिपत्रक काढून ई -पीक पाहणी करण्यासाठी आता सात दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये ई -पीक पाहणी व्हर्जन 3.0 हे ॲप प्लेस्टोअर मधून डाऊनलोड करावे व या ॲपमधून शेतकऱ्यास आपल्या पिकाची ई -पिक पाहणी करता येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई पिक – पाहणी करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शेतकरी तलाठ्याकडे न जाता स्वतःच ई -पिक पाहणीच्या द्वारे आपल्या पिकांची नोंद सहजपणे करू शकतो. तसेच अतिवृष्टीत पिकांचे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मागणी करण्यासाठी ई -पिक -पाहणी असणे आवश्यक आहे.
याशिवाय बँकेच्या वतीने कर्ज वाटप होण्यासाठी शेतकऱ्यांच्या 7 /12 उताऱ्यांवर ई -पीक पाहणी नोंद असणे गरजेचे आहे. म्हणून शेतकऱ्यांनी ई -पिक पाहणी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे .