सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पापरी येथील शेतकऱ्याच्या घरी असलेल्या ‘लक्ष्मी’ या गाईने एकाच वेळी तीन कालवड आणि एक खोंड असे चार वासरांना जन्म दिला आहे. एकाच वेळी चार वासरांना गायीनं जन्म देण्याची पापरी परिसरातील ही पहिलीच आणि दुर्मिळ घटना असल्याने परिसरातील शेतकरी गर्दी करत आहेत.
सुरेश मुरलीधर लोंढे (रा. पापरी. ता. मोहोळ. जि. सोलापूर) असे या शेतकऱ्याचे नाव असून लोंढे हे दरवर्षी ‘लक्ष्मी’ चा वाढदिवसही साजरा करतात. लोंढे हे शेती सोबतच पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करतात.
सध्या त्यांच्याकडे संकरित गाई, म्हशी अशी मिळून १२ दूध देणारे पशुधन आहे. त्यातील लक्ष्मी नावाच्या एका संकरित गाईने गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चार वासरांना जन्म दिला आहे. त्यात तीन कालवडी आणि एक खोंड आहे.
लक्ष्मी गाईचे हे चौथे वेत आहे. गाईने एकावेळी चार पिलांना जन्म देण्याची ही घटना दुर्मिळ असल्याने परिसरातील शेतकरी सुरेश लोंढे यांच्या घरी गाई व त्याच्या पिलांना पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. गाई मध्ये दोन वासरांना जन्म देण्याचे प्रमाण आज पर्यंत निदर्शनास आले आहे. परंतु, एकाच वेळी तीन किंवा चार वासरे होण्याचे प्रमाण क्वचितच असते.
दरम्यान, लोंढे कुटुंबीयांनी पशुधन सांभाळायला सुरुवात लक्ष्मी या गायीपासून पाच वर्षांपूर्वी केली होती. त्यापासूनच लोंढे यांच्या प्रपंचाची आर्थिक घडी व्यवस्थित बसली म्हणून सुरेश लोंढे कुटुंबिय या गाईस ‘लक्ष्मी’ असे संबोधतात.
नोव्हेंबर महिन्यातील २४ तारखेला या गाईला घरी आणले होते. त्यामुळे दरवर्षी २४ नोव्हेंबरला केक कापून वाढदिवस साजरा केला जातो असे लोंढे कुटुंबातील सदस्य गणेश लोंढे यांनी सांगितले.