छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक आघाडीतील नेते सत्ताधारी महायुतीत सामील होत आहेत. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाला आता मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून एक लाख मते घेणाऱ्या शिलदाराने उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. पश्चिम विधानसभा प्रमुख राजू शिंदे ठाकरेंची साथ सोडत भाजपात प्रवेश करणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजी नगरातील पश्चिम विधानसभा प्रमुख राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला रामराम केला आहे. गेल्या काही दिवसापासून ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू होती अखेर त्यांनी आपल्या राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सोपवला. त्यानंतर आता ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. राजू शिंदे यांनी ठाकरे गटाकडून शिंदे गटाचे उमेदवार आणि मंत्री संजय शिरसाट यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. मराठवाड्याआधी परभणीत स्थानिक पातळीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांना भाजपाने धक्का दिला आहे. येथे अनेक उच्चपदस्थ नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने मोठी खेळी खेळत आघाडीला मोठा धक्का दिला आहे.