लोणी काळभोर : यंदा संक्रांतीचे ‘वाघ’ हे वाहन तर उपवाहन ‘घोडा आहे’, वस्त्र पिवळे, हातात गदा घेतलेली आहे. यंदा मंगळवार, दिनांक १४ जानेवारीला मकरसंक्रात असून या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. संक्रांतीचा पर्वकाळ १४ जानेवारीला सकाळी ८.५५ ते दुपारी ४.५५ आहे. धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते जन्मनक्षत्रावरून संक्रांतीचे फळ मिळत असते. यंदा शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा हे जन्मनक्षत्र असलेल्या कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्तींना हानी संभावते.
अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा जन्मनक्षत्र असलेल्या वृश्चिक, धनु, मकर राशीच्या व्यक्तींना उत्तम वस्त्रलाभ देऊ शकेल. आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य जन्म नक्षत्रावर जन्मलेल्या म्हणजेच मिथुन, कर्क राशीच्या व्यक्तींना प्रवास करावा लागू शकतो. यंदा संक्रांत बालव करणावर संक्रमण होत असल्याने वाघ हे वाहन तर घोडा उपवाहन आहे. तीने पिवळे वस्त्र धारण केलेले असून हातात गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासासाठी हातात जाईचे फूल घेतलेले व पायस भक्षण करत आहे. सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वारनाव व नक्षत्र नाव महोदरी आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असून वायव्य दिशेला पहात आहे.
- १४ जानेवारीला मंकरसंक्रातीला पर्वकाळ पुण्यकाळ मानला जातो. या पर्वकाळात केलेल्या दानाला विशेष महत्त्व असते.
- नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळपात्र, गुळ, तीळ, सोने,भूमी, गाय, वस्त्र, घोडा यासारख्या वस्तू दान कराव्यात.
- पर्वकाळात दानसह स्नान, देवाचे नामस्मरण करणे हिताचे ठरते.
- संक्रांत काळात पिवळे वस्त्र, केसर टिळा, मोत्याचे दागिने यासारख्या वस्तू टाळाव्यात तर संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे,कठोर बोलणे, वृक्ष – गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे, कामविषय सेवन करणे ही कामे करू नयेत.
- संक्रांतीशी निगडीत वस्तू त्या वर्षात स्वस्त किंवा महाग होतात, असे संकेत मानले जातात.
- यंदा, सोने तसेच मुल्यवान वस्तुचे दर वाढतील, सोने उच्च पातळी गाठुन नवा विक्रम करेल.
दरवर्षी मकर संक्रांत संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. अशी माहिती यवत येथील राहुल (काका ) अवचट यांनी दिली आहे.