पुणे : राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. येत्या 9 ऑगस्टपासून एसटी महामंडळातील 13 संघटनांनी संप पुकारला आहे. या संपाचा फटका हजारो प्रवाशांना बसणार आहे.
एसटी महामंडळ तोट्यात आहे. महामंडळाला कोरोनाकाळानंतर सन 2020-21 मध्ये तोटा सहा हजार कोटी रुपयांवर गेला होता. त्यानंतर तोटा कमी झाला नाही. हा तोटा 9 हजार कोटी रुपयांवर गेला आहे. एसटीच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी परिवहन महामंडळाला राज्य सरकारवर अवलंबून राहावे लागते.
राज्यभरात एसटीचे 250 डेपो असून, यात वाहक चालक मिळून जवळपास 50 हजार कर्मचारी आणि कार्यालयीन आणि कार्यशाळा कर्मचारी 35 हजारांच्या पेक्षा जास्त आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागासहित पुणे, मुंबई, नाशिक, संभाजी नगर, अकोला, अमरावती, नांदेड आणि नागपूर अशी महानगर येथे जिल्ह्यातील ठिकाणे अशी मिळून जवळपास 50 ते 60 लाखांच्या घरात दैनंदिन प्रवासी प्रवास करतात. जर एसटीचा संप झाला तर ही सगळी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेतील मुख्य साखळी थांबेल.
काय आहेत मागण्या…
– राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे.
– कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा थकबाकी महागाई भत्ता मिळणेबाबत
– घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ थकबाकी अदा करावी
– सन 2016 ते 2020 या कालावधीसाठी जाहिर केलेल्या रू. 4849 कोटीमधील शिल्लक रक्कम वाटप करावी
– सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट 5000 रुपयांची वाढ करावी