पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाला दिवाळीच्या १२ दिवसांमध्ये १५ कोटी ३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून गेल्या दोन वर्षानंतर प्रथमच दिवाळीमध्ये मोठ्या संख्यने प्रवासी वाढल्यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असल्याची माहिती एसटी पुणे विभागाचे वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणावरे यांनी दिली.
एसटी महामंडळाच्या पुणे विभागात १३ आगार आहेत. दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाच्या पुणे विभागातून अडीच हजार अतिरिक्त बस सोडण्यात आल्या होत्या. १९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पुणे विभागातून राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत अधिकच्या बस सोडण्यात आल्या होत्या.
एसटी बस एकूण ३२ लाख नऊ हजार किलोमीटर धावल्या. त्यामधून एसटी महामंडळाला १५ कोटी ३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एसटीला प्रति किलोमीटरमागे सरासरी ४७.८३ रुपये उत्पन्न मिळाले आहे.