पुणे : एसटी महामंडळाच्या 11 कामगार संघटनांच्या कृती समितीने मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. त्यापूर्वी मंत्री उदय सामंत यांच्यासोबत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक पार पडली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली आहे. या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कृती समितीनं हा संप सुरुच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको, यासाठी उदय सामंत यांनी एसटी कर्मचा-यांसोबत चर्चा केली. मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ठाम अशी एसटी कर्मचारी संघटनांची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघू शकला नाही.
सत्ताधारी पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनीही एसटी कर्मचा-यांच्या संपाला पाठिंबा दर्शविला आहे. किंबहुना पडळकर आणि खोत यांच्या एसटी कर्मचारी संघटना देखील संपात होतील, असा निर्णय उभय नेत्यांनी जाहीर केला आहे. आम्ही आधी जनतेचे प्रतिनिधी आहोत आणि नंतर सत्ताधारी पक्षातले आमदार आहोत. लोक आम्हाला आमच्या भुमिकेविषयी विचारतात. त्यामुळे एसटी कर्मचा-यांचे हित आम्हाला महत्त्वाचे वाटते. जर सरकारला संप नको असे वाटत असेल तर त्यांनी कर्मचा-यांच्या मागण्या लगोलग मान्य कराव्यात, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी राज्य शासनाला केले.
उद्या (बुधवार, 4 सप्टेंबर) सायंकाळी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समिती चर्चा करणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री या संपाबाबत काय भूमिका घेणार? मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर संपावर तोडगा निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.