पुणे : एसटीच्या संबंधीत प्रवाशांच्या असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आता एसटी महामंडळाने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. आता एसटीच्या प्रवासात प्रवाशांना काही अडचण आल्यास त्यांनी ती तक्रार अथवा समस्या थेट आगारप्रमुखांना फोन करुन सांगावी, जेणेकरुन त्याचे तातडीने निराकारण होईल, अशा पद्धतीची यंत्रणा एसटी प्रशासनाकडून राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने एसटी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बस ज्या आगाराची आहे, त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक, तसेच तेथील स्थानक प्रमुख व कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
एसटीने प्रवास करताना प्रवाशांचे अनेक तक्रारी असतात. मात्र या तक्रार नेमकी कुठे कराव्यात, हा त्यांच्या समोरचा प्रश्न असतो. यापूर्वी एसटी बसेस मध्ये संबंधित आगाराचा व स्थानकाचा क्रमांक प्रसिद्ध केला असायचा, परंतु काही काळाने हे नंबर दिसेनासे झाले. त्यामुळे एसटीच्या प्रवासामध्ये काही समस्या अथवा अडचण आल्यास त्यासाठी दाद कोणाकडे मागावी? हा एक मोठा प्रश्न प्रवाशांच्या समोर होता. त्यामुळे त्यांच्याच सूचनेवरून एसटी महामंडळाने आता प्रत्येक बसमध्ये ती बस ज्या आगाराची आहे, त्या आगारप्रमुखांचा नंबर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून प्रवासादरम्यान प्रवाशांना अडचण अथवा समस्या निर्माण झाली तर त्या समस्येचे किंवा तक्रारी चे निराकरण तातडीने व्हावे, हा या मागचा उद्देश आहे.
एसटी महामंडळाच्या नव्या निर्णयानुसार आता बसमधील ड्रायव्हर सीटच्या पाठीमागील जागेवर जिथं काही सूचना लिहिलेल्या असतात, आता तिथं संबंधित बसच्या आगारप्रमुखांचा मोबाईल नंबर देण्यात येईल. त्यामुळे, प्रवाशांना प्रवासात काही अडचण आल्यास थेट आगारप्रमुखांशी संवाद साधता येणार आहे.
एसटी प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासादरम्यान त्यांना एखादी अडचण आल्यास थेट तिथे प्रदर्शित केलेल्या क्रमाकांवर संपर्क साधून आपल्या अडचणी अथवा समस्येचे निवारण तातडीने करुन घ्यावे.