Maharashtra Board Exam : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यंदा परीक्षा नेहमीपेक्षा लवकर घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे.
शाळांना परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत काही सूचना देण्यासाठी 23 ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आली आहे. दहावी बारावीच्या परीक्षांची एवढ्या लवकर घोषणा करण्याची बोर्डाची ही पहिलीच वेळ आहे.
दहावी-बारावीचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे…
– दहावी लेखी परीक्षा- 21 फेब्रुवारी ते 17 मार्च
– दहावी प्रॅक्टिकल परीक्षा- 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी
– बारावी लेखी परीक्षा- 11 फेब्रुवारी ते 18 मार्च
– बारावी प्रॅक्टिकल परीक्षा- जानेवारीत सुरु होणार
या कारणाने यंदा लवकर होणार आहेत परीक्षा…
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळण्याकरिता मंडळाने परीक्षेच्या तारखा यंदा लवकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचा निकाल लवकर जाहीर करणे या बाबींचा सारासार विचार करता 2025 ची फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची परीक्षा यंदा 8 ते 10 दिवस आधी घेण्यात येणार आहे.