पुणे : ऐन निवडणूक काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा आणि युवती राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन हे पक्षाला सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.
धीरज शर्मा आणि सोनिया दुहन या अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश करतील असे वृत्त सर्व प्रमुख माध्यमांनी दिले आहे. सोमवारी या दोघांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते धीरज शर्मा हे पवारांची साथ सोडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धीरज शर्मा हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत म्हणाले की, मी धीरज शर्मा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दिलेल्या सर्व पदांमधून स्वत:ला मुक्त करतो आहे, अशी फेसबुक पोस्ट धीरज शर्मा यांनी लिहिली आहे. ही पोस्ट लिहिताना राष्ट्रवादी पक्षाच्या फेसबुक पेजला, शरद पवारांना आणि सुप्रिया सुळे यांना धीरज शर्मा यांनी मेन्शन केलं आहे.
तसेच सोनिया दुहन या शरद पवारांच्या पक्षातील युवती संघटनचे राष्ट्रीय नेतृत्व करत होत्या. बराच काळ त्यांनी प्रवक्ते म्हणूनही काम केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सोनिया दुहन या 2019 च्या राजकीय घडामोडीनंतर चर्चेत राहिल्या. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविथीनंतर काही राष्ट्रवादी आमदारांना खासगी विमानातून दिल्लीतील हॉटेलमध्ये ठेवले होते. त्यावेळी सोनिया दुहन यांच्यावर शरद पवारांनी जबाबदारी सोपवली. त्यानंतर सोनिया दुहन या आमदारांना शिताफिनं हॉटेल बाहेर काढून मुंबईला आणलं होतं. तेव्हापासून सोनिया दुहन माध्यमात झळकल्या होत्या. शरद पवारांच्या विश्नासू म्हणून त्या ओळखल्या जातात.