अजित जगताप
वडूज : राज्य परिवहन महामंडळाच्या वडूज आगाराचे काही दिवसापासून बस फेऱ्यांचे वेळापत्रक असून त्याचा त्रास प्रवासी व शालेय विद्यार्थ्याना होत असल्याने याच्या विरोधात सामाजिक संघटना यांनी आक्रमक भूमिका घेत खटाव तहसीलदार व आगारप्रमुख यांना तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वडूज आगारातून महामंडळ बसची नियमित सेवा सुरु होती. परंतु गेल्या काही दिवसापासून या सेवेत विस्कळीतपणा आला आहे. वेळापत्रक देखील कोलमडल्याने प्रवाशांना अनेकादा बसची वाट पाहताना ताटकळत थांबावे लागते. यात कधी कधी बसची फेरीचा रद्द झाल्याचे सांगण्यात येते. येथून दिवसभरात सुमारे दीड हजार प्रवासी प्रवास करतात. वेळापत्रक कोलमडल्याने या प्रवाशांना दुचारी, चारचाकी, खाजगी वाहने अथवा पायी प्रवास करावा लागतो.
यापूर्वी देखील या संदर्भात जाणीव करून देण्यात आली होती. मात्र महामंडळाचे अधिकारी व स्थानक प्रमुख यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळेच काल सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार शिंदे, डॉ. महेश गुरव, कुणाल गडांकुश, पत्रकार धनंजय क्षिरसागर, नवनाथ देशमुख, दत्तात्रय केंगारे, नितीन राऊत, लालासाहेब माने, अजित जगताप, संतोष भंडारे, धनंजय चव्हाण, पै.रवि फडतरे, महादेव बनसोडे, विजय शेटे,अंकुश दबडे, अनिल माळी, संतोष जाधव, संतोष बरकडे, आनंदा साठे, अजित कंठे, मधुकर मोहिते, रेवेकरवाडी ग्रामस्थ, पालक वर्ग आदिंनी आगार प्रमुखांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. तसेच सेवा पूर्ववत करण्यासाठीचे निवेदन आगार प्रमुख देशमुख, संतोष बोराटे, सय्यद यांना दिले.
सवलत नको पण एसटी फेऱ्या वाढवा…
विस्कळीत झालेल्या महामंडळाच्या सेवेमुळे सर्वात जास्त विद्यार्थी भरडला जात आहे. ग्रामीण भागात बाहेरगावी शिकण्यासाठी जाणारे विद्यार्थी हे शक्यतो महामंडळाच्या बसवर अवलंबून असतात. प्रवासासाठी ते मासिक पास देखील काढतात. मात्र विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेकदा बसची वाट पाहून विद्यार्थी घरी परतत असल्याचे चित्र वडूजमध्ये अनेकदा दिसून येते. त्यामुळे सवलत नको, पण फेऱ्या वाढावा, अशी मागणी जोर धरत आहे.
रोगराईचे आगार म्हणजे वडूज स्थानक…
वडूज बस स्थानकाची अवस्था अतिशय दयनीय झाली असून प्रत्येक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले पाहावयास मिळते. यामुळे अनेकदा विद्यार्थिनी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची कुचंबणा होते. बस देखील अतिशय घाणेरड्या असून अनेक गाड्यात चढताना नाक मुठीत धरून चढावे लागते. आगाराचा कारभार म्हणजे सेवेसाठी नसून प्रवाशांच्या मनस्तापसाठी आहे का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.