सिंधुदुर्ग : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा 26 ऑगस्टला अचानक कोसळला. या घटनेवरुन राज्यात खूप राजकारण झालं. शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सलटन्ट चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चेतन पाटीलच्या कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथल्या घरी जात पोलिसांनी चौकशी देखील केली होती. अशातच आता चेनत पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट चेतन पाटीलला मध्यरात्री तीन वाजता ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. परंतु अद्याप या प्रकरणातील ठाण्याचा शिल्पकार जयदीप आपटे अद्यापही फरार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीवरुन मालवण पोलीसांनी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट चेतन पाटील याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.
चेतन पाटील याला आता मालवण पोलीस ठाण्यात आणले जाणार असून त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी आणखी कोणती नवी माहिती समोर येणार, हे पाहावे लागणार आहे.