छत्रपती संभाजीनगर : एखाद्या बॉलीवूडपटालाही लाजवेल अशी खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगर परिसरात नुकतीच उघडकीस आली आहे. बहिणीच्या प्रेम विवाहाला मदत केली, या गोष्टीचा राग मनात ठेवून भावाने संबंधित तरुणाच्या दुचाकीला बोलेरो कारची धडक देवून खाली पाडले. एवढ्यावरच न थांबता कारचे चाक तब्बल चार वेळा डोक्यावरून घातले आणि त्या २४ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
पवन शिवराम लोढे (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. संभाजीनगरमधील शेंदूरवादा-सावखेडा महामार्गावर ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यात मृत तरुणाचा विवाह होता. घरात आनंदाचे वातावरण होते. लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. यासाठी मृत तरुण आपल्या वडिलांसोबत बँकेतून पैसे आणायला बाहेर गेला होता. त्याचवेळी ही घटना घडली. दुचाकीला बोलेरोच्या मदतीने जोरदार धडक देण्यात आली. तरुण खाली पडल्यानंतर त्याच्या अंगावर चार वेळा बोलेरो कार घालून त्याची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मृत तरुणाच्या कुटुंबात दुःखाची छाया पसरली आहे.
आरोपीच्या बहिणीचा प्रेमविवाह व्हावा यासाठी मृत तरुणाने प्रयत्न केले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अधिक माहितीनुसार, मृत पवन हा शेतकरी असून, त्याच्या मामाचा मुलगा विशाल लक्ष्मण नवले याने संशयित आरोपी सचिन वाघचौरे, विशाल वाघचौरे यांच्या बहिणीशी पळून जावून विवाह केला होता. त्यांच्या विवाहाला पवन याने मदत केली होती. याचाच राग मनात धरून संशयित आरोपींनी बोलेरोने पवनच्या दुचाकीला जोरदार दिली.