नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशातच आता नागपूरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूरच्या शासकीय महाविद्यालय-रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागात असिस्टंट प्रोफेसर असलेल्या महिलेची घरात घुसून डोक्यात रॉडने वार करून हत्या करण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अर्चना अनिल राहुरे असं मृत महिलेचे नाव आहे. नागपूरच्या शासकीय महाविद्यालय रुग्णालयातील फिजीओथेरपी विभागात त्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.त्या लाडेकर-आऊट हुडकेश्वर येथे राहत होत्या. अर्चना यांचे पती अनिल राहुले हे रायपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. ते आठवड्यातून एक-दोन दिवस नागपुरात येत असतात.शनिवारी संध्याकाळी ते नागपूर आले असता घरातून त्यांना दुर्गंधी येत असल्याची जाणीव झाली.घरात गेल्यानंतर त्यांना पत्नी अर्चनाचा मृतदेह बेडजवळ पडलेला आढळला. अर्चना यांच्या डोक्यात रॉड मारल्यामुळे मृतदेहाशेजारी सुकलेले रक्तही दिसून आले, त्यांनी ही माहिती शेजाऱ्यांनाही दिली आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
दरम्यान हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. चोरीच्या उद्देशाने त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला आहे. याप्रकरणी पोलीस आजूबाजूच्या परिसरातले सीसीटीव्हीही तपासत आहेत.