सिंधुदुर्ग : मावलण येथील राजकोट किल्ल्यावर मोठा राडा झाला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि नारायण राणे यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान वाद इतका वाढला की, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तुफान मारमारी केली.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे पाहणीसाठी आले. त्यावेळी आदित्य ठाकरे दाखल होताच प्रवेशद्वारावरच राडा झाल्याचे पाहायला मिळाला. पोलिसांनी लगेच कार्यकर्त्यांना बाजूला घेतले. मात्र आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी आदित्य ठाकरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीनं आज निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आणि संबंधितांचे राजीनामे मागत हे आंदोलन करण्यात आलं.
यावेळी, आदित्य ठाकरे म्हणाले, 24 वर्षाच्या मुलाला कंत्राट कोणी दिले? ते फरार आहे त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली? पीडब्ल्यूडीचे मंत्री आहेत त्यांच्यावर एफआयआर दाखल झाली आहे का? हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी येत असताना राडा झाला. पत्रकाराला धक्काबुक्की झाली. मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे की, महाराजांच्या किल्ल्यांमध्ये आपल्याला राजकारण करायचे नाही म्हणून मी कार्यकर्त्यांना देखील अडवले आहे. या बालीशपणात मला पडायचे नाही. पंतप्रधानांना खुश करायचे. त्यांना निवडणुकीच्या आधी डिसेंबरमध्ये बोलवण्यात आले.