मुंबई : भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मात्र, यावेळी विधानसभेत अध्यक्षांची निवड होत असताना शिवसेना ठाकरे गटातील एकही आमदार सभागृहात उपस्थित राहिला नाही, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं आहे. त्यानंतर राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होत असताना ठाकरे गटाचे आमदार गैरहजर होते. शिवसेना पक्षाचा निकाल देताना ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यावेळी नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना पात्र ठरवले होते. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष अधिकृत शिवसेना असल्याचा देखील निर्णय त्यांनी घेतला होता. हा निर्णय घेताना नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाचा आधार घेतला होता. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने नार्वेकर यांच्या निर्णयावर आक्षेप घेत त्यांच्यावर आरोप केले होते. नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय घेतल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाने घेतला होता.
आता राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड होत असताना शिवसेना ठाकरे गटाचे सर्व आमदार गैरहजर असल्याचे दिसून आले. 20 पैकी एकही जण सभागृहात उपस्थित राहिला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.