नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने आता महाराष्ट्रासह इतर राज्यांतही झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
शरद पवारांना बुधवारपासून (दि.21 ऑगस्ट) केंद्राची अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे. सीआरपीएफचे दहा जवान शरद पवारांसोबत असणार आहे. नुकताच शरद पवारांसोबत सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांना सुरक्षेचा आढावा घेतला आणि त्यानंतर शरद पवारांना सुरक्षा प्रदान करण्याचे निश्चित करण्यात आले. सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
शरद पवार आगामी निवडणुकीत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरणार आहेत. शरद पवार काही महिन्यांपूर्वी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी गेले होते. त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. आगामी काळात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा दिली आहे.
झेड प्लस सुरक्षा म्हणजे काय ?
झेड प्लस सुरक्षा ही भारतातील सुरक्षिततेची सर्वोच्च श्रेणी मानली जाते. झेड प्लस सुरक्षेत, 10 पेक्षा जास्त कमांडो आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह 55 प्रशिक्षित कर्मचारी संबंधित व्यक्तीजवळ तैनात जातात. हे सर्व कमांडो 24 तास त्या व्यक्तीभोवती बारीक नजर ठेवतात. सुरक्षेमध्ये गुंतलेला प्रत्येक कमांडो मार्शल आर्टमध्ये तज्ञ असतो. यासोबतच या गटाकडे आधुनिक शस्त्रेही असतात. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अनेक मोठे नेते आहेत ज्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
झेड प्लस सुरक्षा कोणाला दिली जाते?
झेड प्लस ही सुरक्षा राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा अत्यंत महत्त्वाच्या लोकांना दिली जाते. या सुरक्षेत एका पोलिस अधिकाऱ्यासह 10 पेक्षा जास्त एसपीजी कमांडो असतात. सुरक्षेची पहिली फेरी ही एनएसजी हाताळत असते. दुसरी फेरी ही एसपीजी कमांडो हाताळत असतात. यात आयटीबीपी आणि सीआरपीएफ कमांडोंचा समावेश असतो. झेड प्लस सुरक्षेत एस्कॉर्ट आणि पायलट वाहनांची देखील सुविधा दिली जाते.