पुणे : राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेसह मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्याचा विचार सुरु आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, एससीईआरटी ने राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराख़डा जाहीर केला आहे. त्यावर आक्षेप आणि सुचनाही मागवण्यात आल्या आहेत. यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे.
नेमका काय आहे प्रस्ताव?
राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांच्या शिक्षण आराखड्यामध्ये भगवत गीता, मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे. यावरुन राजकीय वाद-प्रतिवाद सुरु झाले आहेत. नव्या शिक्षण आराखड्यामध्ये प्राचीन ज्ञानवारसा जपूया या या मथळ्याखाली पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव आहे. याअंतर्गत 1 ते 25 मनाचे श्लोक हे इयत्ता तिसरी ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत पाठांतरासाठी असतील. तसेच 25 ते 50 क्रमांकाचे मनाचे श्लोक हे इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी असतील. त्याचप्रमाणे भगवदगीतेचा अध्याय 12 वा 9 व्या इयत्तेपासून 12 व्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी असेल, असा प्रस्ताव आराखड्यात आहे. तसेच मूल्ये आणि स्वभाववृत्तीच्या अध्ययनासाटी मनुस्मृतीमधील श्लोकांचासमावेश केल्याचं आराखड्यात दिसत आहे. हा एकूण 336 पानांचा आरखडा आहे. या आराखड्यावर आक्षेप आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.
या निर्णयावरुन नवा वाद उभा राहिला असूनन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि मनाचे श्लोक समाविष्ठ करण्याचा विचार असल्याचे माझ्या वाचण्यात आले. यावरुन राज्य सरकारची काय मानसिकता आहे, हे लक्षात येते. मुलांच्या डोक्यात काय घालायचे सुरु आहे हे समजत नाही, पण मोठ्यांनी याबाबत भूमिका घ्यायला हवी. हे सर्व धक्कादायक आहे, असे म्हणत शरद पवार यांनी या निर्णयाला विरोध केला.
या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मनाचे श्लोक हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानूवर्ष म्हटले जातात, ऐकले जातात, बोलले जातात. आता ते अभ्यासक्रमात आहे की नाही हे मला माहिती नाही. मी ते तपासलेले नाही. एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की विनाकारण संभ्रम तयार करायचा प्रयत्न चुकीचा आहे,’ असं फडणवीस पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.