Sharad Pavar : पंढरपूर, (सोलापूर) : भगीरथ भालके यांच्या बीआरएस पक्षप्रवेशाच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत बीआरएस पक्षात प्रवेश केला. या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली. “एखादी व्यक्ती गेली तर फार चिंता करायची गरज नसते. भगीरथ भालके यांना आम्ही ज्या वेळेला विधानसभेला संधी दिली, त्यानंतर आमच्या लक्षात आलं होतं की आमची ही निवड चुकीची होती. त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली. (Sharad Pavar)
राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव तसेच तेलंगणाचं संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होते. तेलंगणाहून जवळपास ६०० गाड्यांचा ताफा या कार्यक्रमाला आला होता. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. (Sharad Pavar)
या सर्व घडामोडींबाबत बोलताना शरद पवार यांनी बीआरएस पक्षावर टीका केली. “विठुरायाच्या दर्शनासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले, ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र, विठ्ठलाच्या दर्शनासाठी येताना शेकडो गाड्या आणि लवाजमा आणून शक्तीप्रदर्शन करणे हे चिंताग्रस्त आणि वादग्रस्त आहे”, असं शरद पवार थेट म्हणाले. (Sharad Pavar)
दरम्यान, भालके यांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षांपासून इतर नेते सजग झाले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत भगीरथ भालके यांच्यासोबत न जाण्याबरोबर चर्चा झाली. तसेच भगीरथ भालके यांच्याबरोबर कुणी जाणार नाही. ते एकटे बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केला जात होता. (Sharad Pavar)
दरम्यान, भगीरथ भालके यांचे वडील भारत भालके यांचं कोरोना काळात निधन झालं होतं. त्यानंतर पंढरपुरात पार पडलेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. (Sharad Pavar)