पुणे : मुर्ती प्रतिष्ठापणेच्या बहाण्याने कर्नाटक येथे नेऊन पुजाऱ्यासह त्यांच्या सात शिष्यांना डांबून ठेवत तब्बल 5 कोटींची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या टोळीतील तिघा जणांना बिबवेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बिबवेवाडी पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई केली असून यामधील सर्वांची सुटका करण्यात आली आहे. बिबवेवाडी पोलिसांच्या दोन धडाकेबाज पोलिसांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. दरम्यान, न्यायालयाकडून आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रामू अप्पाराय वळुन (वय २९, रा. त्रिकुंडी, ता. जत, सांगली), दत्ता शिवाजी करे (वय २०) हर्षद सुरेश पाटील (वय २२, रा. आसंगी ता. जत, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी बजरंग तुळशीराम लांडे (वय ५१, रा. पीएमटी कॉलनी, समर्थनगर, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडे हे पुजारी आहेत. तर, अन्य मुले ही त्यांची शिष्य आहेत. आरोपींनी २९ जुलै रोजी संध्याकाळी लांडे यांच्या मुलाची भेट घेतली होती. मुलगा स्वप्नील याला विजापुरमध्ये हर्षद पाटीलच्या घराची पूजा करायची असल्याची बतावणी करण्यात आली. तसेच, मुर्तीची प्रतिष्ठापना करायची असल्याचे सांगत कर्नाटकला बोलावून घेतले. फिर्यादी लांडे व त्यांचे सात शिष्य कर्नाटकला गेले. आरोपींनी त्यांना एका खोलीत डांबून ठेवले आणि लांडे यांच्या फोनवरून त्यांच्या घरच्यांना फोन करून पाच कोटींची खंडणीची मागणी केली.
याबाबत बिबवेवाडी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस उपायुक्त आर. राजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगल मोंढवे, निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक अशोक येवले, अंमलदार ज्योतिष काळे, सुमित ताकपेरे यांनी तपास सुरू केला. आरोपींच्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. आरोपी आणि फिर्यादी कर्नाटकमधील रायचूरमधील एका गावात असल्याचे पोलिसांना समजले.
त्यानंतर, अंमलदार ज्योतिष काळे आणि सुमित ताकपेरे यांनी कर्नाटकमध्ये धाव घेतली. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन आरोपी असलेल्या ठिकाणी धाड मारण्यात आली. आरोपींकडे हत्यार होते. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी सोबत शस्त्र घेतली होती. मुलांचा घातपात होण्याची शक्यता असल्याने विशेष खबरदारी बाळगण्यात आली होती. सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींची महागडी मोटार जप्त केली आहे. सर्वांना सुखरूप पुण्यात आणण्यात आले असून सर्व मुलांना त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले आहे.