पुणे: राज्यातील (Schools Closed) शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. येत्या 5 डिसेंबर रोजी राज्यभरातील शाळा बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात असून मुख्याध्यापक महामंडळाने राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता असल्याने त्या दिवशी अनेक शाळा बंद राहण्याची शक्यता आहे.

पुण्यात झालेल्या बैठकीत या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. 5 डिसेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढून विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे दाद मागण्यात येणार आहे.
मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चा
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या नेतृत्वाखाली प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपले विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलक एकत्र येणार आहेत. अनेक मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
मुख्य मागण्या कोणत्या?
2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये.
15 मार्च 2024 रोजीचा संचमान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषांनुसार मान्यता द्यावी.
‘शिक्षणसेवक’ योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी.
संघटनेची प्रमुख मागणी म्हणजे राज्यातील सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेणे. सध्याच्या नियमानुसार टीईटी परीक्षा न दिल्यास किंवा अपयश आल्यास शिक्षकांना सेवा सुरू ठेवता येणार नाही. या निर्णयाला शिक्षकांचा विरोध असून सरकारने हा नियम मागे घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
मुख्याध्यापक महामंडळाने स्पष्ट केले आहे की, मागण्या विचारात घेतल्या नाहीत तर संपाची तीव्रता वाढवली जाईल. त्यामुळे 5 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा मोठ्या प्रमाणात बंद राहण्याची शक्यता आहे.







