पुणे: पुण्यातील (Pune News) नवले पूलवर होणाऱ्या अपघातांची वाढती संख्या पाहता, प्रशासनाने अखेर महत्त्वपूर्ण आणि कठोर पाऊल उचलले आहे. सातत्याने होणारे अपघात आणि त्याविरोधात नागरिकांनी केलेली तीव्र आंदोलने लक्षात घेऊन, राष्ट्रीय महामार्ग विभागाने (NHAI) गुरुवारपासून एक महत्त्वाचा बदल लागू केला आहे. अपघातांना आळा घालण्याच्या उद्देशाने, राष्ट्रीय महामार्गावरून सेल्फी पॉइंटच्या बाजूने नन्हे येथील मानाजीनगरकडे जाणारा रस्ता आता कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे.

साताऱ्याकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनचालकांना आता नन्हे परिसरात जाण्यासाठी वेगळ्या पर्यायाचा अवलंब करावा लागणार आहे. यापुढे या चालकांना स्वामिनारायण मंदिर लगतच्या सर्व्हिस रोडचा वापर करणे अनिवार्य असेल. पूर्वी बंद असलेल्या या रस्त्यावरुन अनेक वाहनचालक धोकादायक पद्धतीने वळण घेत असल्याने अपघातांची शक्यता वाढली होती.
रस्ता बंद झाल्यानंतर सर्व वाहने सर्व्हिस रोडवरून वळवली जात असल्याने, सर्व्हिस रस्त्यावर काही काळ वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे. तरीही, सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिक नागरिकांनी आता केवळ तातडीच्या उपाययोजनांवर न थांबता, प्रशासनाला पुढील काळात ठोस उपाय योजनांवर लक्ष द्यावे लागणार आहे, जेणेकरून या धोकादायक मार्गावरील अपघातांची मालिका कायमस्वरूपी थांबेल. दीर्घकालीन उपायांवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.







