पुणे: पुण्यात (Pune News) आगामी नगरपरिषद आणि नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फुरसुंगीकरांशी संवाद साधला. सभेत बोलतांना त्यांनी नागरी समस्यांवर, विशेषतः रस्त्यांच्या अत्यंत वाईट स्थितीवर, त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली. “शहराची झालेली दुरावस्था पाहून मला लाज वाटते आहे. तुम्ही इथे राहताच कसे? मी जिल्ह्याचा पालकमंत्री असूनही ही स्थिती पाहून लाज वाटते,” अशा संतप्त शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अजित पवार यांनी स्थानिक नेत्यांवर कठोर टीका केली. “एवढी मोठी दुरावस्था असतानाही तुम्ही काहीच कसे केले नाही?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष सरोदे यांना उद्देशून त्यांनी पुढारीपणाचे महत्त्व सांगितले. “तुम्हाला वाटतं पुढारीपण खूप सोपे आहे! पण लोकांचे प्रश्न सोडवायला खूप कष्ट घ्यावे लागतात, सामान्य लोकांसाठी खूप पळावं लागतं, हे काम करणाऱ्यालाच माहीत असतं,” असे ते म्हणाले.
“संतोष सरोदे हा नगराध्यक्षपदासाठी जास्त योग्य आणि लायक उमेदवार आहे. त्याने राष्ट्रवादीत गेली 25 वर्ष काम केले आहे. तुमच्या साथीने तो निवडून येईल आणि लोकांचे प्रश्न सोडवेल,” असा विश्वास अजित पवार यांनी फुरसुंगीकरांना दिला.







