Pune Leopard: पुणे: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत सध्या बिबट्यांच्या (Leopard) वावर वाढत चालला आहे. जंगलापासून ते मानवी वस्तीत बिबट्यांचा मुक्त वावर दिसून येत आहे. काही भागात तर लहान मुलांवर, शेळी, मेंढ्यावर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. दुर्दैवाने या घटनांमध्ये अनेकांनी प्राण गमावले. तर काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभर बिबट्याच्या दहशतीने भीती वातावरण निर्माण झाले आहे. Pune Leopard News,

हेही वाचा- थंडी गायब, पारा वाढला! आज सर्वात जास्त उकाडा जाणवणार; कसे असणार आज पुण्यातील हवामान? वाचा
दरम्यान, पुणे शहरातील औंध परिसरातही बिबट्याचा वावर आढळून आल्यानंतर वनविभागाने विशेष पथके तैनात केली आहेत. थर्मल ड्रोन, ट्रॅप कॅमेरे, झूम स्कोप यांचा वापर करून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे पथकही यात सहभागी आहे.
वनविभागाने विशेषतः जंगल परिसर आणि मोठ्या प्रमाणात झाडीझुडपी असणाऱ्या वस्तीतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
स्थानिकांसाठी वनविभागाकडून महत्त्वाच्या सूचना
शेतात किंवा बाहेरच्या ठिकाणी रात्री जाणे आवश्यक असल्यास समूहाने जा, हातात काठी, शिटी, किंवा मोबाईलवर गाणी वाजवा. उघड्या जागी शौचास जाणे टाळा. शाळा जर वनक्षेत्राजवळ असेल तर मुलांना समूहाने पाठवा किंवा पालकांनी सोबत सावधगिरी घ्यावी. अफवा, बनावट फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू नये. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होते. रात्री दरवाजे लॉक करूनच झोपा; शक्य झाल्यात घराबाहेर झोपणे टाळा. लहान मुलं व ज्येष्ठ नागरिकांना संध्याकाळी किंवा पहाटे एकटे बाहेर सोडू नये. पाळीव जनावरे बंदिस्त गोठ्यात ठेवा; अन्नकचरा योग्य प्रकारे व्यवस्थापित करा; मांसाचा कचरा उघड्यावर टाकू नका. बाहेरील लाईट व्यवस्थित ठेवा; सगळ्यात महत्त्वाचं चालताना टॉर्चचा वापरा. स्मशानभूमी, शाळा परिसर, उद्याने असलेल्या भागात पुरेशी प्रकाशयोजना करा आणि CCTV नीट कार्यरत ठेवावे.
बिबट्या दिसल्यास काय करावे?
-
घाबरू नका, पळू नका किंवा पाठ फिरवू नका. पळणाऱ्या व्यक्तीचा बिबट्या पाठलाग करू शकतो.
-
हात वर करून हळूहळू मागे सरका आणि मोठ्याने आवाज करा.
-
बिबट्या जवळ असल्यास हातवारे करत धैर्याने मागे हटावे.
-
डोळ्यात-डोळे टाळा; शांत आवाजात बोलत राहा.
-
बिबट्याला पळून जाण्यासाठी रस्ता मोकळा ठेवा.
प्रत्येक नागरिकांनी जबाबदारी घेणं गरजेचे आहे. वनविभागाने दिलेल्या माहितीचे आणि महत्त्वपूर्ण सूचानेचे पालन करणे आवश्यक आहे. आवश्यक असल्यास काही भागात फेऱ्या किंवा हालचाल बंद केली जाऊ शकते. बिबट्याची माहिती किंवा हालचाल दिसल्यास 1926 या क्रमांकावर तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी.







