पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुणे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विद्यापीठ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. ७ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत जमावबंदी लागू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पुणे विद्यापीठात काही दिवसापूर्वी दोन संघटनांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची तक्रार, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण अशा घटनांमुळे विद्यापीठात काही दिवसापासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी पुणे पोलिसांना पत्र दिले होते. त्यानंतर पुणे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विद्यापीठाच्या आवारात जमावबंदी लागू करण्याचे आदेश सात नोव्हेंबरला दिले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या काही दिवसांत विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या असून, पोलिसांकडे अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत. या घटनांची गंभीर दखल घेत पुणे विद्यापीठात निर्बंध लागू केले आहेत. या आदेशात नमूद केलं आहे कि, शिक्षण घेणाऱ्यांसाठी सौहार्दपूर्ण आणि शांततामय पूरक वातावरणाची आवश्यकता असल्याने शंभर मीटर परिसरात निर्बंध घालणे जरुरीचे आहे. या आदेशातून विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पोलिस अधिकारी, सुरक्षा अधिकारी यांना वगळण्यात आले असून आदेशाचा भंग केल्यास कलम १८८ नुसार कारवाईचा इशाराही आदेशाद्वारे देण्यात आला आहे.
असे असतील निर्बंध?
- फौजदारी संहिता प्रक्रिया १९७३ च्या कलम १४४ नुसार विद्यापीठ आणि सभोवतालच्या शंभर मीटर परिसरात विद्यार्थ्यांशिवाय इतर व्यक्तींना एकत्र जमण्यास प्रतिबंध
- विद्यापीठात प्रवेश करण्यास प्रतिबंध
- विद्यापीठ परिसरात दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई