अजित जगताप
Satara News | वडूज : सर्वसामान्य कुटुंबातील सुशिक्षित, कुशल- अकुशल बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या सुप्त भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आय.ए.एस अधिकारी तथा सेवानिवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी महारोजगार मेळावा आयोजित केला. या महारोजगार मेळाव्यामध्ये बेरोजगारांची मोठी गर्दी दिसून आली.
परंतु, या गर्दीतही अत्यंत नेटक्या पद्धतीने महाविद्यालय प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे अनेक बेरोजगारांना युवकांना रोजगाराची संधी मिळाल्याबद्दल उन्हातान्हातून मोठ्या आशेने आलेल्या युवक युवतींना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव पसरले.
महारोजगार मेळाव्याचे आयोजन…
माण- खटाव मतदार संघातील युवक- युवतींसाठी शनिवारी दि. १५ एप्रिल रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या कालावधीत वडूज नगरीतील छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी झाल्या होत्या. बारावी, आय.टी.आय, बी.ए, बी. कॉम ,बीएस.सी, बी.सी.ए, डिप्लोमा, मेकॅनिकल, इलेक्ट्रिक, आय.टी, कम्प्युटर व इतर डिग्री तसेच विविध क्षेत्रातील उमेदवारांसाठी ड्रीम सोशल फाउंडेशन, राज्यश्री शाहू अकॅडमी, पुणे, एज्युकेशन व छत्रपती शिवाजी हायस्कूल जुनियर कॉलेज यांच्यावतीने या महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
नामांकित कंपन्यांचे प्रमुख अधिकारी व त्यांच्या कंपनीत असलेले सुमारे दीड हजार रिक्त पदे नियुक्ती यासाठी आयोजित या महारोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी दहिवडी व पुणे येथे मेळावा झाला आहे आणि त्यानंतर आता हा मेळावा होत आहे. सध्या सर्वात मोठा व महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रोजगारी हा आहे.
मेळाव्यातून न्याय देण्याची भूमिका प्रभाकर देशमुख यांनी घेतली…
पूर्वीच्या काळामध्ये एक व्यक्ती उत्पन्न वाढत होते व इतर लोक त्या उत्पन्नावर ती आपली प्रगती साधत होते. तो स्वर्णकाळ होता. अलीकडच्या काळात उपलब्ध असलेल्या नोकरी कमी झालेले आहेत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे खाजगीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे या महारोजगार मेळाव्यातून न्याय देण्याची भूमिका प्रभाकर देशमुख यांनी घेतल्यामुळे अनेक मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले आहे.
या मेळाव्याला महाविद्यालय प्रशासनाने संपूर्ण सहकार्य केले. स्वतः राष्ट्रवादी नेते प्रभाकर देशमुख, हर्षदा जाधव-देशमुख यांनी योग्य मार्गदर्शन करून चांगल्या पद्धतीने रोजगार मेळावा आयोजित केल्याबद्दल पालक वर्गाने पाठिंबा दर्शवला आहे. या वेळी प्राचार्य एस. बी. पाटील, डी .एन .जाधव, एल. एच. जाधव, बी. पी. साबळे, एस. एन. खुडे, बी. बी. राऊत, पी. आर. राऊत, डोइफोडे व राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे गणेश गोडसे, तानाजीराव वायदंडे, योगेश जाधव, विपुल गोडसे, सूर्यकांत कोकाटे, अजित जाधव, शशिकांत देशमुख, सुनिल मिसाळ, प्रतिक बडेकर, इम्तियाज बागवान, अमोल काटकर, निलेश जाधव, शोभा वायदंडे, स्वप्नाली गोडसे, अक्षय थोरवे यांच्यासह डॉ. संतोष देशमुख, बाळासाहेब पोळ यांनी युवक- युवतींना प्राथमिक माहिती व त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी सहकार्य केले.
माण खटाव विधानसभा मतदरसंघातील बेरोजगार युवकांना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्यासाठी हा मेळावा आयोजित केला होता. परंतु, राजकीय पक्ष नेत्यांची विचार पिठावर गर्दी दिसून आल्याने काहींनी काढता पाय घेतला होता. त्याचीही दबक्या आवाजात चर्चा होत आहे.