बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कारवाईला वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सरकारची भुमिका मांडली. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल. तपासासाठी आयजी स्तरावर एसआयटी स्थापन केली जाईल, अशी घोषणा फडणवीसांनी घेतली. यांच्या भूमिकेनंतर आता या प्रकरणाच्या घडामोडींना वेग आला आहे. हे हत्या प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे.
विशेष सरकारी वकील म्हणून सरकारने बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती केली आहे. सद्यस्थितीत कोल्हे हे वकील म्हणून काम पाहणार आहेत. तसेच केसच्या संपूर्ण तपासासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्जवल निकम यांची नेमणूक करा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. या घटनेवरुन धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासांपासून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात सहभागी करुन घेऊ नका, अशी मागणी मस्साजोग गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र काल शनिवारी झालेल्या खातेवाटपामध्ये धनंजय मुंडेंना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.