“पुरा झाला आज मनीचा डोहळा, पालखी सोहळा पाहीला मी”, या उक्ती प्रमाणे महाराष्ट्रातल्या संतांनी जिथे वास्तव्य केले, जिथे जन्म झाला ती भूमी पवित्र झालेली आहे. त्यातच एक संतराज महाराज पालखी पंढरपुरच्या दिशेने रवाना झाली.यावेळी टाळ – मृदुंगाच्या साथीने संपूर्ण परीसरात “पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल”असे वातावरण निर्माण झाले होते. श्रीक्षेत्र संगम येथील संतराजमहाराज पालखीचे आषाढी वारीसाठी रविवार (ता.22रोजी) पावसाच्या सरी झेलत,ज्ञानोबा-तुकारामांचा गजर, वारकरी, टाळकरी, विणेकरी, खांदेकरी, पताकावाले यांनी धरलेला ठेका मन आनंदून सोडत होता. मुळा-मुठा व भीमा नदी यांच्या संगमावरील पुलावर पालखी सोहळा कोंडेवस्तीकडे येताना वारकरी पैलतीरावर बसून डोळ्यांमध्ये साठवत होते. या सोहळ्यामध्ये पहिल्याच दिवशी सुमारे १० हजारांच्यावर भाविक सहभागी झाल्याची माहिती विश्वस्तांनी दिली. हे प्रस्थान 58 वे वर्ष साठी पंढरपूर कडे रवाना होत आहे .आज सकाळी सोहळ्यानिमित्त संगमेश्वराचा अभिषेक झाला. त्यानंतर पालखी, पादुका, मानाचा अश्व, संगमेश्वर यांचे पूजन करण्यात आले.

पालखीरथाची आकर्षक अशी फुलाची सजावट मच्छिंद्र अडागळे यांनी केली होती. हजारो भाविक भक्तासह वारकरी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. सोहळा संगम येथून निघाल्यानंतर मजल दरमजल करीत सोहळा न्याहरीसाठी कोंडेवस्तीवर विसावला. कोंडे परिवाराच्यावतीने ५ क्विंटल खिचडीवाटप करण्यात आली. सोहळा अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर देलवडीकडे मार्गस्थ झाला. देलवडी ग्रामस्थांनी रांगोळी, पायघड्या व स्वागतकमानी उभारून सोहळ्याचे स्वागत केले. हा सोहळा मुक्कामासाठी एकेरीवाडी येथे स्थिरावला. या कार्यक्रमासाठी सिद्ध सद्गुरू शांतिनाथ महाराज, आमदार राहुल कुल , आमदार ज्ञानेश्वर कटके, रमेश थोरात, कांचन ताई कुल, मंगलदास बांदल, नामदेव महाराज साठे, भाऊसाहेब ढमढरे ,वीरधवल जगदाळे, बाळासो थोरात, उद्योगपती पोपट शेलार,विकास शेलार, सयाजी ताकवणे, माऊली ताकवणे, चंद्रकांत कोंडे,शिवाजी वाघोले, पोपटराव ताकवणे, नरेंद्र काटे, आदी मान्यवर व संतराज देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ वारकरी उपस्थित होते.








