पुणे: यंदा मान्सून वेळेच्या आधीच दाखल झाल्यामुळे मावळ आणि लोणावळा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आत्तापर्यंत अधिक पाऊस पडल्याने निसर्गाचे सौंदर्य खुलून आले आहे. याचाच आनंद लुटण्यासाठी पुणे आणि मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या प्रमाणावर लोणावळा परिसरात दाखल होत आहेत.

भुशी धरणात पर्यटकांची गर्दी

लोणावळ्यातील भुशी धरण हे पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरत असून, धरण ओसंडून वाहू लागल्याने पाऱ्यांवरून खाली कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पाण्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधत पर्यटकांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. भुशी धरणाशिवाय इतर धबधबे आणि धोकादायक पर्यटनस्थळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवेशावर बंदी घातली आहे. मात्र, ही बंदी झुगारत पर्यटकांनी मौजमजा सुरूच ठेवली आहे. काही ठिकाणी पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन करत धोकादायक भागात प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वीची दुर्घटना अद्याप ताजी
अलीकडेच तळेगावजवळील कुंडमळा येथे लोखंडी पूल कोसळून चार पर्यटकांचा मृत्यू झाला होता आणि ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतरही पर्यटकांकडून निष्काळजीपणा सुरुच आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत की, पर्यटकांनी स्वतःची काळजी घेत पर्यटन करावे. प्रत्येक वर्षी भुशी धरण परिसरात अपघात होण्याचे प्रमाण अधिक असते. पर्यटक पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जाऊन अनोळखी आणि धोकादायक ठिकाणी पोहोचत असल्याने अपघातांची शक्यता वाढते. तरुणांनी उत्साहाच्या भरात सय्यम आणि दक्षता ठेवणे आवश्यक आहे.
सह्याद्रीतील सौंदर्य आणि धोके दोन्ही एकत्र
सह्याद्रीच्या हिरव्या पर्वतरांगांमधून कोसळणारे शुभ्र धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. अनेक जण धबधब्याखाली थांबून पाण्याचा आनंद घेतात. मात्र, अशा ठिकाणी दगड कोसळण्याची शक्यता असते, त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. लोणावळा पोलिसांनी पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्त वाढवला असून, नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. तरीही काही ठिकाणी पर्यटकांकडून हुल्लडबाजी आणि गोंधळ होत असल्याचे दिसून येत आहे.







