Sambhajinagar News : : छत्रपती संभाजीनगर : नमाज पठण करण्यासाठी त्यांना दुपारी घरी यायचे होते. अंघोळ करून नमाज पठणाला जावे, या उद्देशाने त्यांनी पत्नीला फोन करून अंघोळीसाठी गरम पाणी करून ठेवण्यास सांगितले. पत्नीने पाणी गरम करून बादलीत ओतले. एवढ्यात घरात खेळत असलेल्या त्यांच्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा बादलीला धक्का लागला आणि गरम पाणी अंगावर सांडले. या घटनेत चिमुकली गंभीररित्या भाजली गेली. उपचारासाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान चिमुकलीचा करुण अंत झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील घटना
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, शिद्रा हारून शेख (वय २ वर्षे, रा. कादंबरी दर्गा छावणी, छत्रपती संभाजीनगर) असे मृत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. शिद्राची आई गृहिणी आहे, तर वडील वेल्डिंगचे काम करतात. त्यांनी तीन मुली. पैकी शिद्रा ही सर्वात लहान मुलगी होती. (Sambhajinagar News) शुक्रवारी सकाळी दहा वाजता हारून शेख कामावर गेले. दुपारी एक वाजता नमाज पठण करण्यासाठी ते घरी येत होते. त्यासाठी त्यांनी पत्नीला अंघोळीसाठी पाणी ओतून ठेवण्यास सांगितले.
पत्नीने अंघोळीसाठी पाणी तापवून बादलीत ओतले. एवढ्यात घरात खेळत असलेल्या दोन वर्षांच्या शिद्राचा बादलीला धक्का लागला. गरम पाणी अंगावर पडून ती भाजली. (Sambhajinagar News) पालकांनी तत्काळ तिला जवळच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शिद्रा वाचण्यासाठी झुंज देत होती. मात्र, उपचार सुरू असतानाचा तिची प्राणज्योत मालवली. शिद्राची झुंज अपयशी ठरली.
दोन वर्षांच्या चिमुकलीचा अशा प्रकारे करुण अंत झाल्यामुळे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Sambhajinagar News ) या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप जाधव करत आहेत.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये पालकांच्या निष्काळजीपणामुळे बालकांचा जीव धोक्यात आल्याच्या अनेक घटना घडत आहेत. आईस्क्रिम घेण्यासाठी गेलेल्या चिमुकलीला विजेचा शॉक लागून मृत्यू तर एका चिमुकल्याचा पाण्याच्या हौदात पडून दुर्दैवी मृत्यु झाल्याच्या घटना अलिकडेच घडल्या आहेत. (Sambhajinagar News) यामुळे चिमुकल्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :