श्रीगोंदा : छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व्हावे यासाठी आम्ही मागील ५ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहोत. स्मारकासाठी वेळोवेळी केलेली आंदोलने आणि पाठपुरावा यामुळे जवळपास दिड कोटी रुपये इतका निधी या कामासाठी मंजूर झाला असुन, स्मारकासाठीचा प्रस्तावित सरकारी जागेत असलेले खाजगी अतिक्रमण काढण्यास महसुल प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. तसेच अतिक्रमण करणाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे.
स्वराज्यधर्मासाठी आत्मबलिदान देणारे सर्वोत्तम भूमिपुत्र छत्रपती संभाजी राजेंच्या स्मारकासाठी, आज ३५० वर्षानंतर देखील लोक अडथळा निर्माण करत आहेत, ही निंदनीय बाब आहे. आमचा स्वाभिमान असणारे संभाजी महाराज यांचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन तिथे स्मारक व राजेंचा अश्वारूढ पुतळा उभारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
छत्रपती संभाजी महाराज चौक हा श्रीगोंदा शहरातील प्रमुख चौक असून बहादुरगडाकडे जाणारा रस्ता देखील याच चौकातून जातो. हजारो तरुण मुले मुली याचं चौकातून दररोज शाळा कॉलेजसाठी प्रवास करत असतात. या मुलांना समोर भव्य छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक सदैव प्रेरणा देत राहिल आणि येणाऱ्या पिढीला संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची ओळख होईल. यासाठी आम्ही स्मारकासाठी आग्रही आहोत.
प्रशासनाने लवकरात लवकर सदर जागेवरील अतिक्रमण हटवले नाही, तर आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला आमचे आंगठे कापून रक्ताचा अभिषेक घालणार आहोत. ज्या राजाने स्वराज्यासाठी आपल्या रक्ताचे पाट वाहिले, त्या राजाच्या स्मारकासाठी तमाम शंभुप्रेमींनी आंदोलनात सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावे. असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येत आहे.
आयुष्यातील तरुणपणातील ५ वर्ष स्मारकासाठी आम्ही संघर्ष करण्यात घातली आहेत. आता आर-पारची लढाई आहे. आमच्या शरीरातील शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही रक्ताभिषेक घालून छत्रपती संभाजी राजेंना मानवंदना देणार आहोत.
– अरविंद कापसे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड
आमचा स्वाभिमान छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक श्रीगोंदा शहरात उभे राहणे, ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब असून, स्मारक उभे करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार. तरुणाईला दिशा देणार छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामात बाधा निर्माण करणारे अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करून, प्रशासन तमाम शिव शंभु प्रेमींच्या भावना दुखावत आहे. याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि याची किंमत प्रशासनाला मोजावी लागेल.
– इंजि. शाम जरे, तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड