मुंबई : विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांनी आज पहिलंच भाषण केलं. रोहित पाटील सभागृहातील सर्वात तरुण आमदार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते सांगलीतल्या तासगाव कवळे महाकाळ मतदारसंघातून विजयी झाले आहेत. पाटील यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं.
रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन केलं आणि म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’, असं म्हटल्याने देवेंद्र फडणवीसांनाही हसू आले. आता संतांच्या वाणीतूनही आपलं नाव इतक्या गोड पद्धतीनं घेतलं गेलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळात काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षांना गोड पद्धतीची वागणूक द्याल अशी विनंती करतो,’ असं पाटील यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचं नाव अमृता आहे. तोच धागा पकडत रोहित पाटील यांनी भाषणातून बॅटिंग केली. ‘अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हटलंय. कारण पुराणातसुद्धा अमृताला वेगळं महत्त्व होतं आणि आजही आहे. विरोधी पक्षालासुद्धा तुम्ही सहकार्य कराल अशी मी तुम्हाला विनंती करतो. आदरणीय एकनाथ शिंदे, आदरणीय अजितदादा यांचंही मी अभिनंदन करतो,’ असं पाटील म्हणाले.
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी आज विधिमंडळात त्यांचं पहिलंच भाषण केलं. अवघ्या 25 वर्षांच्या रोहित पाटील यांनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. विरोधकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार कराल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.