पुणे : राज्यभरातील रेशन दुकानदार एक जानेवारी २०२४ पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने रेशन दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा बेमुदत संप पुकारला आहे. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील या ‘बंद’मध्ये सहभागी असणार आहेत.
राज्यात सुमारे ५२ हजार रास्त भाव दुकानदार आहेत. त्यांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन असल्याची टीका महासंघाकडून करण्यात आली. आंदोलन आणि मोर्चाची सरकारकडून दखल घेतली नाही. महासंघाच्या निवेदनाची दखल घेत सरकारने सचिवांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात केवळ आश्वासने देण्यात आल्याचेही महासंघाकडून सांगितले.
दरम्यान, सरकारकडून कोणताही निर्णय न झाल्याने महासंघाच्यावतीने नाईलाजास्तव ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने एक जानेवारीपासून पुकारलेल्या संपात सहभाग होण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे.
रेशन दुकानदारांच्या मागण्या काय?
– रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार करा.
– मार्जिन मनी ३०० रुपये करा.
– टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या.
– कालबाह्य नियम बदला
– आनंदाचा शिधा कायमस्वरुपी राबवा.
– कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा.