पुणे : प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्योपती रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्यात आला. टाटा यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत या पुरस्कारची घोषणा केली होती. महाराष्ट्र भुषण पुरस्काराच्या धरतीवर या वर्षीपासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामधल्या अलौकिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतो. त्याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी या वर्षीपासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात आला आहे.
यंदापासून या पुरस्काराची सुरुवात झाली. हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार आहे. महिला उद्योजिका, मराठी उद्योजक आणि अन्य एकाला असे तीन पुरस्कार पण देण्यात येणार आहे. रतन टाटा यांचे सामाजिक आणि उद्योगातील मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा गौरव हा पुरस्कार देऊन करण्यात आला आहे.
‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप..
‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप २५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरुप १५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, ‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मान चिन्ह व मानपत्र असे आहे.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सकडून मानद डॉक्टरेट पदवी..
टाटा समूहाची कमान रतन टाटा यांच्याकडे आहे. विनयशीलता आणि मृदु स्वभाव यामुळे रतन टाटा यांचे वेगळेपण ठसते. यापूर्वी उद्योगातील चांगल्या कामगिरीसाठी २००० मध्ये केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. फॉर्च्युन मासिकाने उद्योगातील २५ सर्वात प्रभावशाली उद्योजकांपैकी ते एक असल्याचा गौरव केला होता. टाईम मासिकाने २००८ मध्ये जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश केला होता. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने त्यांना मानद डॉक्टरेट दिली आहे.