नागपूर : नागपूरमध्ये सध्या अधिवेशन सुरू असून विधानपरिषदेला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची एकमताने निवड झाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्यानंतर यावर एकमताने शिक्कामोर्तब झाले.
या निवडणुकीसाठी बुधवारी अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीने उमेदवार दिला नाही. शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची कालच निवड निश्चित झाली होती. आज गुरुवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सर्व नेत्यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
दरम्यान, महायुतीकडून राम शिंदे यांचे नाव निश्चित झाल्यानंतर ते म्हणाले, “आमचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधानपरिषदेचा सभापती म्हणून माझी निवड केली. विधानपरिषदेचा सभापती बिनविरोध निवडून यावा. तसेच विरोधकांनी उमेदवार न देता माझ्या निवडीला पाठिंबा दिला आहे. याबद्दल महायुती आणि महाविकास आघाडीचे आभार मानतो. पक्षाला माझ्यावर विश्वास असल्याने त्यांनी मला ही जबाबदारी द्यायचं ठरवले आहे. या संधीचे मी नक्की सोने करेन, असेही त्यांनी म्हटले आहे.