पुणे : गेल्या चार-पाच दिवसांमध्ये राज्यासह मुंबईमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तर काही भागात मुसळधार पावसामुळं जीव देखील गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन तीन दिवसात ईशान्य आणि पुर्वेकडील राज्यांत जोरदार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश ढगाळ राहणार आहे असा इशाराही देण्यात आला.
पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन-तीन दिवस पुण्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याच सांगण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ज्या भागात चांगला पाऊस झालाय, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. चांगला पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या आहेत. तर काही भागात अद्यापही पेरण्या झाल्या नाहीत. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत.