(Railway News) पुणे : नवीन मार्ग सुरू करण्यासोबत विद्युतीकरण आणि दुहेरीकरणाचे काम रेल्वेकडून वेगाने सुरू आहे. मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये मध्य रेल्वेने पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली.
मागील आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने दुहेरीकरणाचे काम अतिशय वेगाने केले आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात २०२१-२२ मध्ये मध्य रेल्वेने एकूण १७७.११ किलोमीटर मार्गावर पायाभूत सुविधा वाढवल्या होत्या. त्यामध्ये नवीन लोहमार्ग (३१ किमी), दुहेरीकरण (७४.७९ किमी) आणि इतर कामांचा समावेश होता. तसेच ३३९ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले. अलीकडेच मध्य रेल्वेने १०० टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्टही पूर्ण केले आहे.
एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत आतापर्यंत, मध्य रेल्वेने २५७ किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण आणि मल्टिट्रॅकिंग पूर्ण केले आहे. यामध्ये नरखेड-कळंभा (१५.६ किमी), जळगाव-सिरसोली (११.३५ किमी), सिरसोली-माहेजी (२१.५४ किमी), माहेजी-पाचोरा तिसरी लाइन (१४.७० किमी), अंकाई किल्ला-मनमाड (८.६३ किमी), राजेवाडी-जेजुरी-दौंडज (२०.०१ किमी), काष्टी-बेलवंडी (२४.८८ किमी), वाल्हा-नीरा (१०.१७ किमी).
कळंभा-काटोल (१०.०५ किमी), जळगाव-भादली (११.५१ किमी), कान्हेगाव-कोपरगाव (१५.३७ किमी), सातारा-कोरेगाव (१०.९० किमी), भिगवण-वाशिंबे (२९.२० किमी), बेलापूर-पुणतांबा (१९.९८ किमी), भादली-भुसावळ (१२.६२ किमी) या कामांचा समावेश आहे. याचबरोबर बेलापूर-सीवूड्स-उरण या नवीन मार्ग प्रकल्पाची पाहणी रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी केली आहे.
याबाबत बोलताना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी म्हणाले….!
“क्षमता वाढल्याने मध्य रेल्वेला वाहतूककोंडीवर मात करण्यात मदत होईल. याचबरोबर गाड्या सुरळीत चालवण्यास मदत होईल. प्रवाशांच्या सुविधांवर लक्ष केंद्रित करून आम्ही रेल्वेच्या पायाभूत सुविधांना चालना देण्याचे आणि रेल्वेचे जाळे भविष्यासाठी सज्ज करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.