Raigad News : रायगड : जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली असून, संपूर्ण गाव मातीखाली गाढले गेले. दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आणि तेथे सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. बचाव कार्यादरम्यान आतापर्यंत १०३ लोकांची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आले असून, १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी सध्या डोंगराच्या पायथ्याशी ५० ते ६० कंटेनर्सची व्यवस्था करण्यात येणार असून, येथील ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
५० ते ६० कंटेनर्सची तात्पुरती व्यवस्था!
या वेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, काही नागरिक भातशेतीच्या कामासाठी इतरत्र गेले असून काही मुले आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचाही शोध घेतला जात आहे. (Raigad News ) दुर्घटनाग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून, त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ५० ते ६० कंटेनर्स आणण्यात आले आहेत. डोंगराच्या पायथ्याशी त्यांची व्यवस्था केली जाईल.
दरम्यान, दुर्घटनाग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी चर्चा झाली आहे. त्यासंबंधी पुढील कार्यवाई युद्ध पातळीवर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. इर्शाळवाडी अत्यंत दुर्गम ठिकाणी वसलेली असल्याने आणि फक्त माणसांच्या मदतीनेच येथे मदत पोहोचवता येणे शक्य आहे. (Raigad News ) स्थानिक नागरिक, एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ यांच्या पथकांच्या माध्यमातून बचावकार्य सुरू असून, इतर सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि सततचा पाऊस अशा परिस्थितीतही लवकरात लवकर मदतकार्य पूर्ण करावे यासाठी शक्य तितके प्रयत्न सुरू आहेत.
डोंगरावर मदतकार्यासाठी जाण्यात अनेक अडथळे येत आहेत. मुख्यमंत्री स्वतः हजर राहून अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देत आहेत. दीड तास पायपीट करू त्यांनी इर्शाळवाडी गाठली. (Raigad News ) केंद्रीय गृहमंत्री, वायुसेनेचे अधिकारी, परिसरातील सामाजिक आणि दुर्गप्रेमी संस्था, गिर्यारोहक यांच्याकडून त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली.