Raigad News : रायगड : इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इशाळवाडी गावात बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दरड कोसळली. घटना घडल्याचे कळताच तत्काळ प्रशासनाचे लोक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, येथील भौगोलिक परिस्थिती पाहता डोंगरदरीत वसलेल्या तीव्र उतारावरील या वस्तीपर्यंत पोहोचून मदतकार्य करताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागते आहे.
घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
दुर्घटनाग्रस्तांना तत्काळ मदत मिळवून देण्याच्या हेतूने स्नायफर डॉग स्क्वाडदेखील घटनास्थळी पोहोचले आहे. घटनास्थळ अतिदुर्ग भागात असल्याने कोणत्याही वाहनाने घटनास्थळी पोहोचणे अवघड आहे. यासाठी डोंगर पायथ्याशी तात्पुरता नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. (Raigad News) याशिवाय हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर्स पहाटेपासून सांताक्रुज हवाई तळावर बचावासाठी तयार आहेत. मात्र, खराब हवामानामुळे त्यांना उड्डाण करता आलेलं नाही.
दरम्यान, घटनास्थळी जाण्यासाठी मेणवली या गावातून पायी मार्ग काढावा लागतो. तीव्र उतारावरील वस्तीमुळे जेसीबी घटनास्थळी घेऊन जाणे शक्य नाही. त्यामुळे त्वरित बचाव कार्य होण्यासाठी सिडको व स्थानिक यंत्रणेमार्फत बचाव कामासाठी आवश्यक साधनसामग्री आणि मजूर पाठवण्याची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महसूल व पोलीस खात्याचे क्षेत्र अधिकारी घटनास्थळावर उपस्थित आहेत.
शोधकार्य सुरळीत ठेवून मलब्याखाली अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर सुखरूप बाहेर काढता येईल यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. (Raigad News) शक्य तितक्या लवकर ढिगार्याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढणे हे प्रशासनापुढे आव्हान आहे. जेसीबी एअरलिफ्ट करून मातीचा ढीगारा उपसता येईल का, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दोन अर्थ रिमुव्हिंग मशीन घटनास्थळी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शोधकार्य वेगात सुरू आहे.