Raigad News : रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळून घडलेल्या दुर्घटेमध्ये २७ रहिवाशांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून, ५७ रहिवासी बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. दरडीखाली अडकलेल्या गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी तत्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. परंतु, चार दिवसांनंतर घटनास्थळी मातीखाली गाढल्या गेलेल्या मृतदेहांची दुर्गंधी पसरल्यामुळे तसेच मुसळधार पावसामुळे शोधमोहिमेत व्यत्यय येत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. २३) उशीरा बचावकार्य थांबवण्यात आले आहे. एनडीआरएफ, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
बेपत्ता ५७ रहिवाशांना मृत घोषित करण्यात येणार
इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर विविध पथकांकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, दुर्घटनास्थळाची भौगोलिक स्थिती लक्षात घेता तंत्रज्ञानाची मदतही मिळणे अवघड आहे. (Raigad News) तसेच मृतदेहांच्या विघटनाची प्रक्रिया सुरू झाली असून, जनावरे तसेच मानवी मृतदेहांच्या विघटनामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली आहे. शोधमोहीमेत मृतदेहांचे अवघे काही अवशेषच हाती येत असल्याचे विदारक चित्र आहे. त्यामुळे अखेर शोधमोहीम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, बेपत्ता ५७ रहिवाशांना मृत घोषित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या दुर्घटनेतून बचावलेल्या रहिवाशांचे तात्पुरते आणि कायमस्वरूपी पुनर्वसन अशा दोन टप्प्यांत व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये, तात्पुरत्या स्वरूपातील पुनर्वसन म्हणून कंटेनरमध्ये असून त्यांच्यासाठी आवश्यक कपडे, धान्य यांची व्यवस्था करण्यात आली आहे. (Raigad News) दरडग्रस्त १४१ रहिवाशांचे तात्पुरते पुनर्वसन चौक येथील डायमंड पेट्रोलपंप येथे कंटेनरमध्ये करण्यात आले आहे.
पीडितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांनी सिडकोशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्याचे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तर पुनर्वसनासाठी महसूल अधिकाऱ्यांसह विविध शासकीय विभाग (Raigad News) आणि अधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मदत व पुनर्वसनासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री तसेच मनुष्यबळ हे पनवेल आणि नवी मुंबई महापालिका; तसेच पेण, अलिबाग, खोपोली, खालापूर आणि कर्जत नगरपरिषदांकडून उपलब्ध करून घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Raigad News : रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळून १६ जण ठार ; शंभरहून अधिक लोक अडकल्याची भीती
Raigad News : इर्शाळवाडी ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही