कोल्हापूर : मिरज-पुणे मार्गावर कोरेगाव ते सातारा यादरम्यान रेल्वेच्या #Railway दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने कोल्हापूर-पुणे व कोल्हापूर-सातारा या दोन्ही पॅसेंजर गुरुवारी (ता.२) मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तर कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेसही आज रविवार (दि.५) पासून आठ दिवस बेळगावमधून सुटणार आहे.
सातारा-कोल्हापूर पॅसेंजर कोल्हापुरात सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी येते. तर कोल्हापूर-सातारा पॅसेंजर सायंकाळी पाच वाजता कोल्हापुरातून सुटते. ही पॅसेंजर नोकरदार, विद्यार्थी, व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. मात्र या दोन्ही गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत.
पॅसेंजर रद्द झाल्याने मिरजेहून कोल्हापूरकडे येणाऱ्या प्रवाशांना पहाटे ५ वाजून ४० ते पावणेअकरा वाजेपर्यंत एकही ट्रेन उपलब्ध होणार नाही. यामुळे प्रवाशांना एक तर पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी येणारी महालक्ष्मी किंवा १० वाजून ४५ मिनिटांनी सुटणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसने कोल्हापूरला यावे लागणार आहे.
मिरजेकडे (#miraj) जाण्यासाठी दुपारी तीन वाजता सुटणारी कोल्हापूर-कलबुर्गी सुपरफास्ट एक्स्प्रेसनंतर थेट सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी सुटणारी कोल्हापूर-सांगली पॅसेंजर या दोन ट्रेनचा पर्याय राहणार आहे.
दरम्यान, कोल्हापूर- तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस ५ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत बेळगावमधून सुटणार आहे. तर तिरुपतीहून येणारी ट्रेनही या कालावधीत बेळगावपर्यंतच येणार आहे. बेळगावमधून दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी ही ट्रेन सुटणार आहे.
तसेच तिरुपतीहून येताना ही ट्रेन बेळगावात सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी पोहोचणार आहे. अशी रेल्वे प्रशासनाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.
@railway #kolhapur #express